रत्नागिरी:- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लोकांमधील हलगर्जीपणा दूर करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यापुढे विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर आता पोलीस थेट कारवाई करून 500 रुपयांचा दंड वसूल करणार आहेत.
1 मार्च पासून ही कारवाई होणार असली तरी पाहिले दोन दिवस पोलीस नागरिकांमध्ये जनजागृती करणार व त्यानंतर ज्या नागरिकांच्या तोंडावर मास्क नसतील त्यांच्यावर पाचशे रुपये दंड वसूल करणार आहेत. हा दंड कोणताही पोलिस कर्मचारी करू शकणार आहे. यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना देखील अनेकजण शहरात विना मास्क फिरताना दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असल्याने याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी नगर परिषदेसह पोलिसांनाही दंडवसुली बाबत आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून सोमवारपासून विना मास्क फिरणाऱ्याना पाचशे रुपये दंड ठोठावला जाणार आहे.









