रत्नागिरी:- कोरोनातील दोन वर्षानंतर प्रथमच नवीन शैक्षणिक वर्षाचा आनंद घेत पहिल्या दिवशी विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. बुधवारपासून (ता. १५) पावणेतीन हजार प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील किलबिलाट सुरु होणार असून सुमारे दीड लाख विद्यार्थी पहिल्या दिवशी हजेरी लावतील. दप्तराचे ओेझे कमी करण्यासाठी संयुक्त अभ्यासक्रमांचा उपक्रम यंदापासून अमलात आणला जाणार असल्यामुळे पहिली ते चौथीचे विद्यार्थी एकच पुस्तक घेऊन शाळेत उपस्थिती लावणार आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाला बुधवारपासून आरंभ होणार आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार प्राथमिक आणि माध्यमिकच्या सुमारे चारशे शाळा आहेत. प्राथमिक शिक्षणाचा आरंभ करण्यासाठी १२ हजार २०६ विद्यार्थी उत्सूक झाले असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश दिला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे २०२० पासून नव्या शैक्षणिक वर्षाचा मूर्हूत हुकला होता. जिल्हा परिषदेच्या १ ली ते ८ वी मध्ये शिकणार्या सव्वा लाख विद्यार्थ्यांना ६ लाख १३ हजार ५४ पाठपुस्तके वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी नवीन पुस्तके, दप्तर आणि नवी उमेद घेऊन शाळेत जाण्यास विद्यार्थीही उत्सुक झाले आहेत. ६ ते १४ वयोगटातील एकही मुल शाळाबाह्य राहू नये, यासाठीही नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात दोन मुलांचा प्रवेश केला गेला आहे. जिल्ह्यातील ५१ हजार ९६३ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामध्ये दोन गणवेशासाठी ६०० रुपये अनुदान वितरीत केले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांपासून सर्वच अधिकारी पहिल्या दिवशी शाळा भेटी करुन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक उत्साह वाढवणार आहेत.
शिक्षण विभागाकडून यावर्षीपासून १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. शाळेचे ओझे कमी करण्यासाठी संयुक्त अभ्यासक्रमाचे पुस्तक बनविण्यात आले आहे. शाळेत शिकवले जाणारे सर्वच विषय एकाच पुस्तकात समाविष्ट केले आहेत. या विद्यार्थ्यांना विविध विषयांची पुस्तके सांभाळावी लागणार नाहीत. त्याचे ओझेही कमी होणार आहे. जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार विद्यार्थी आहेत. दप्तरात पुस्तकांचे ओझे कमी झाल्याने वह्या, कंपास बॉक्स अशाच वस्तू राहतील. यंदाच्या शैक्षणिक वर्षाचा हा नवा उपक्रम राहणार आहे. १३ जुनला शिक्षकांनी शाळांमध्ये हजेरी लावून नवीन वर्षासाठीची तयारी केली आहे. गावागावातील बंद शाळा साफसफाई करुन ठेवण्यात आल्या आहेत.









