आजपासून दहावीची परीक्षा; 18 हजार 323 विद्यार्थी देणार परीक्षा

रत्नागिरी:- विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि पुढील शैक्षणिक वाटचाल ठरवणारा टप्पा म्हणजे 10 वीच्या परिक्षेला आज 1 मार्चपासून पारंभ होत आहे. या परीक्षेसाठी कोकण बोर्डामार्फत कडक नियोजन आखण्यात आलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 18 हजार 323 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेत व कॉपीमुक्त पार पडावी यासाठी राज्य मंडळाची व कोकण विभागीय मंडळाची निगराणी राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्पत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत होत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिह्यातील परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. हे आदेश परीक्षा केंद्रांवर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचेबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत, मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या 10 वी च्या परिक्षेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात 13 परिरक्षक नेमण्यात आले आहेत. परिक्षेसाठी 426 शाळा, मुख्य परिक्षा केंद्र 73 इतकी संख्या आहे. या परिक्षा केंद्रांवर जिल्ह्यातील 18 हजार 323 विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. 10 वी च्या परीक्षेत काही ठिकाणी कॉपी सारखे प्रकार रोखण्यासाठी या परीक्षा काळात करडी नजर ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात शिक्षण शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (योजना), प्राचार्य (डाएट), महिला भरारी पथक, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशा भरारी पथकांचा समावेश आहे.

बारावी परिक्षेसाठी पशासनाकडून महत्वपूर्ण सूचनाः
परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करता येणार नाही.
100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील.
परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.
कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल.
परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील.