आजच्या अंगारकीला ‘श्रीं’च्या दर्शनाचा योग नाहीच

गणपतीपुळे मंदिर राहणार बंदच; कोरोनाने फटका 

रत्नागिरी:-कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे राज्यातील धार्मिक व प्रार्थना स्थळे बंद आहेत. त्यामुळे आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रसिध्द श्री देव गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उद्या मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार आहे. कोरोनामुळे आतापर्यंतच्या दुसर्‍या अंगारकीला भक्तगण श्रींच्या दर्शनाला पारखेच राहणार आहेत.

अंगारकीसह संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी भक्तगणांची प्रचंड गर्दी होते; मात्र कोरोनामुळे मंगळवारी अंगारकीदिवशी मंदिर दर्शनासाठी बंदच राहणार असल्याचे संस्थान श्री देव गणपतीपुळेतर्फे सांगण्यात आले. महाराष्ट्रात कोवीड प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम टाळावेत असे आवाहन केले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडूनही कोविड प्रतिबंधात्मक आदेश आलेले आहेत. ही कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे सर्व गणेशभक्तांनी देवस्थानला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध राज्यातून अंगारकीच्या दिवशी भक्त येत असतात. कोरोनामुळे गेल्या दिड वर्षात सर्वच देवस्थानं दर्शनासाठी बंदच आहेत. या कालावधीतील दुसरी अंगारकी आहे. दुसर्‍या लाटेमध्ये गेली चार महिने गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी बंदच आहे. सध्या लाट ओसरत असली तरीही प्रशासनाकडून मंदिरांबाबत निर्णय झालेला नाही. दर्शनासाठी गणपतीपुळे अ‍ॅपवर ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

दरम्यान गणपतीपुळे परिसरात काही परजिल्ह्यातील पर्यटक येऊन जात आहेत. दिवसाला शंभरहून अधिक पर्यटकांची हजेरी लागते. ते कळस दर्शन घेऊन समुद्रकिनारी फिरुन माघारी परततात. गेल्या पाच दिवसात पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग बंद आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून येणार्‍यांसाठी कुंभार्लीचा पर्याय आहे. परंतु पुर परिस्थितीमुळे कळस दर्शनासाठी येणार्‍यांची संख्या अत्यंत कमी राहील असा अंदाज वर्तविला जात आहे.