वीज बिलाविरोधात मनसेचा दणदणीत मोर्चा
रत्नागिरी:- वीज बिलाविरोधात काढलेला मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सरकारला इशारा दिला. विज बिल माफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा उर्जामंत्र्यांना फिरू देणार नाही. जिल्ह्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करु, असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
वीज बिल माफी झालीच पाहिजे…राज साहेब अंगार हाय बाकी सब भंगार….कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन केले. जिल्ह्याचे मनसेचे नेते नगराध्यक्ष वैभव खेडेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष रुपेश सावंत यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. मारुती मंदिर येथुन मोर्चाला सुरवात झाली. मनसे कार्यकर्ते आक्रमक होतील अशी शक्यता असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी खेडेकर म्हणाले, अनेकांना वाटत होते की मनसे आहे कुठे, मोर्चा कसा निघणार. पण हा विशाल मोर्चा पाहिल्यानंतर राजकर्त्यांना धडकी भरली असेल. कोरोना काळात एकमेव मनसे पक्ष रस्त्यावर उतरून काम करत होता. बाकी पक्षाचे खासदार, आमदार घरी क्वारंटाईन झाले. परप्रांतीयांना घरी पाठवण्यासाठी राज्यातील याच सरकरने पैसे खर्च केले पण, मुंबईतील चाकरमान्यांना घरी आणण्यासाठी पैसे नव्हते. जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब हे परिवहन मंत्री आहेत. पण त्यांनाही निर्णय घेता आला नाही. ते साडेचार दिवसाचे पालकमंत्री आहेत. तीच स्थिती राज्यातील विज ग्राहकांची आहे. मुख्यमंत्री म्हणाले विजबिलात सुट देणार, ऊर्जामंत्री यांनी 100 युनीट माफ करतो सांगितले. कुणी म्हणाले दिवाळीत गोड बातमी देणार. पण त्या सगळ्या भुलथापा होत्या. विज बिल माफीचे श्रेय कुणाला मिळू नये यासाठी सरकार हा निर्णय घेत नाही. वीज बिल माफ केेले नाही तर, मंत्र्यांना फिरू देणार नाही. अन्यायाविरोधात आम्ही लढत आहोत. माफ केल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही. ग्राहकांनीही वीजबिल भरू नये.
याप्रसंगी जितेंद्र चव्हाण म्हणाले, आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेले आहे. वीज बिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले, मात्र ते आता माफ करणार नाही असे त्यांनीच जाहीर केले आहे. विज वितरण कंपनीने जनतेला आश्वासन दिलेले आहे. लॉकडाऊन काळात अनेक जणांच्या नोकर्या गेल्या. या परिस्थितीतही महावितरणकडून मोठ्या प्रमाणात वीजबिल पाठवण्यात आली. कमी व्हावे यासाठी मनसेने अनेक आंदोलने केली. जनतेला जागरूक करण्यासाठी आजचे हे आंदोलन आहे. मनसे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भगवा पट्टा, हातात भगवे झेंडे असे चित्र या मोर्चामध्ये पहायला मिळत होते. त्यामुळे हा परिसर भगवेमय झाल्यासारखाच दिसत होता.









