आगामी निवडणुकीत महायुतीच्या विजयाचे फटाके वाजतील: ना. उदय सामंत

रत्नागिरी:- शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) मधील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुतीच्या एकसंघ संकल्पाचा पुनरुच्चार करत, आगामी निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.

​भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण आणि मा. खासदार नारायण राणे यांनी महायुतीला अधिक बळकट करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सामंत यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “महायुती ही केवळ राजकीय आघाडी नाही, तर विकासाचा आणि जनतेच्या विश्वासाचा एकसंघ परिवार आहे,” असे ते म्हणाले.
​ते म्हणाले की, मा. देवेंद्र फडणवीस, मा. एकनाथ शिंदे साहेब आणि मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आली आहे.
​स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत पूर्ण समन्वय राखला जाईल, असे ना. सामंत यांनी स्पष्ट केले. “कार्यकर्त्यांमध्ये एकोपा राखून, परस्पर संवाद व समजुतीच्या आधारे सर्व निर्णय घेतले जातील,” असे आश्वासन त्यांनी दिले.
​महाविकास आघाडीने केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या विश्वासाने उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे सांगून ते म्हणाले, आगामी निवडणुका महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या एकतेची परीक्षा आहेत आणि या परीक्षेत आपण सर्वजण यशस्वी होऊ, याचा मला ठाम विश्वास आहे. आपल्या भाषणाचा समारोप करताना त्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकीच्या रणांगणात तीन तारखेला जे फटाके वाजतील ते महायुतीच्या विजयाचेच फटाके असतील. महिला, युवा आणि सर्व पदाधिकारी यांच्या सक्रिय सहभागाने महायुतीची ताकद प्रत्येक मतदारसंघात दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​या बैठकीला आमदार किरण उर्फ भैया सामंत, रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार राजन साळवी, बापूसाहेब चव्हाण, अमित केतकर, राजेंद्र महाडिक, महेश मयेकर, दादा ढेकणे, विवेक साळवी, सुदेश मयेकर, राजन शेटे यांच्यासह मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.