रत्नागिरी:- आगामी निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार आहोत, आम्हाला घसघशीत बहुमत मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांमार्फत आपली भूमिका मांडावी असे सांगत, प्रत्येक जागेवर महायुतीकडून तयारी सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. यासह, त्यांनी मराठा आरक्षण, शिंदे-फडणवीस यांच्यातील संबंध आणि विरोधकांवरील टीकेवरही भाष्य केले.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, ‘मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.’ यासोबतच, मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. मराठा आणि ओबीसी दोन्ही समाजांसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील एका हॉर्डिंगवरून सुरू असलेल्या वादावर बोलताना ना.सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील युती अभेद्य असल्याचं सांगितलं. ‘आमच्यात कोणताही श्रेयवाद नाही. ज्यांच्या पोटात पोटशूळ उठलाय, तेच असे गैरसमज पसरवत आहेत,’ असे ते म्हणाले. हे सांघिक काम असून, त्यात देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पाया पडत असतील तर त्यात गैर काही नाही, असे सांगून त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना ना. सामंत यांनी त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. त्यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला न्याय दिला आहे, असे ते म्हणाले. तर संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘त्यांच्या बोलण्याने निवडणुका जिंकल्या जात नाहीत आणि महाराष्ट्रातील जनता त्यांना फारशी किंमत देत नाही.’ रोहित पवार यांच्याबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. हा प्रश्न जर शरद पवार यांनी विचारला असता, तर मी उत्तर दिलं असतं. रोहित पवार यांच्यावर मी का बोलू? असे म्हणत त्यांनी उत्तर देण्याचं टाळले.