रत्नागिरी:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. यापुढील निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील, पार्लमेंटरी बोर्डात जे निर्णय घेतले जातात ते महायुतीच्या नेत्यांना मान्य असतात. त्यामुळे आचारसंहितेनंतरच यावर वरिष्ठ विचार करतील अशी स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आ. रविंद्र चव्हाण यांनी भाजपाच्या कार्यालयात भेट देऊन पदाधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर भाजपाच्या रत्नागिरी दक्षिण आणि रत्नागिरी उत्तरच्या पदाधिकार्यांशी त्यांनी माळनाका येथील विश्रामगृहावर संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीकडून देशभर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी संघटन पर्व कार्यक्रम सुरु आहे. राज्यात 80 संघटनात्मक जिल्ह्यांची रचना करण्यात आली आहे. 1214 मंडले तयार करण्याचे काम सुरु असून, पदाधिकार्यांवर प्राथामिक जबाबदार्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पदाधिकार्याकडून कामांची माहिती घेतली जात आहे. विविध उपक्रमांचे माहिती त्यात्यावेळी वरिष्ठ पातळीवरुन घेण्यात येत आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामाचे मुल्यमापन वरिष्ठ पातळीवरुन सुरु असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. 25 जूनपयर्र्त महत्वाच्या नेमणूका करुन मंडल रचना पूर्ण करण्याची प्रक्रिया होईल असेही त्यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर दरम्यान लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बांधणी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी महत्वाच्या आहेत. या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांना बळ मिळत असते असे त्यांनी सांगितले.
महायुती म्हणूनच पुढील निवडणुका लढल्या जातील, आचारसंहिता लागू झाल्यावर पार्लमेंटरी बोर्ड यावर निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय महायुतीच्या नेतेमंडळींना मान्य असतो. त्यामुळे आतापासून निवडणुकीचा विचार करण्याऐवजी पक्ष संघटना वाढीवर आम्ही भर दिला असल्याचे आ. रविंद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. प्रत्येक पक्षाला संघटना वाढीचा अधिकारी आहे. त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. मात्र पक्ष वाढवताना महायुतीत वाद होऊ नयेत ही आपली भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर तोडगा काढत असतात असेही आ. चव्हाण यांनी सांगितले.
मागील काही महिन्यात महायुती म्हणून चांगले काम सुरु असून, अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी त्यामुळे पूर्ण झाली आहे. नवीन निर्णयांचे नागरिकांनी स्वागत केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आदी उपस्थित होते.