संवाद यात्रेत प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांची घोषणा
रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक बसपा स्वबळावर लढणार आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी सज्ज रहा असे बहूजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांनी जाहीर केले. तर जाती-धर्माचे राजकारण करणार्या काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी सारख्या राजकीय पक्षांना मुठमाती देण्याची वेळ आली असून बसपा त्यांच्याविरोधात प्रत्येक निवडणुकीत लढा देईल असेही यावेळी सांगितले.
बसपाच्या संवाद यात्रेचा दुसरा टप्पा रत्नागिरीतून प्रारंभ झाला. यानिमित्ताने रविवारी (ता. 24) माळनाका येथील मराठा भवन सभागृहात आयोजित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष ताजने बोलत होते. यावेळी प्रशांत इंगळे, राजेंद्र आयरे, अनिकेत पवार, यासिन परकार, प्रविण मर्चंडे, आनंदा कांबळे, समिर भुवड, राजु जाधव, प्रेमदास गमरे, मिथुन कांबळे, उमेश पवार, अॅड. ज्ञानरत्न जाधव उपस्थिती होते.
राज्यात बसपाचे सरकार निवडूण आणण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांच्या सुचनेवरून संवाद यात्रा सुरू झाल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी कोविड योध्दा डॉ. मंदार कांबळे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली अश्विनी कांबळे आणि कोविड काळात अंत्यसंस्कार करणार्या पथकाचे सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. ताजने म्हणाले, संवाद यात्रेतून राज्यभरात संघटनास्तरावर वैचारिक आंबेडकरवादी लोक तयार करायचे आहेत. राजकीय सत्तेची किल्ली तयार करायची असेल तर संघटना बांधणीसाठी सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागा. राज्यात हेगडेवार, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, पवार यांच्या नावाने सरकार येऊ शकते. तर डॉ. बाबासाहेबांच्या नावाने सरकारही येऊ शकते. हे सरकार आणण्यासाठी संघटना बांधणीच्या प्रामाणिकपणे कामाला लागा.