रत्नागिरी:- सूनबाई सासरे व दीर एकाच वर्षी बारावी परीक्षा पास झाल्याचेही पाहिले आहे. अशीच एक घटना रत्नागिरीमध्ये समोर आली आहे. हातखंबा येथे आई, वडील व मुलाने एकाच वेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल व शिक्षणाच्या लालसेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
हातखंबा येथील बौद्धवाडी येथे राहणाऱ्या कांबळे कुटुंबातील तिघांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या एकाच कुटुंबातील तिघांनी बारावी परीक्षेत उत्तम गुण संपादन करून इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. शिक्षणाचे महत्व आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही दिसून येत आहे. ही घटना सोशल मीडियासह तालुक्यात सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.
बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यानंतर बारावी पास झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकजणांनी काबाड कष्ट करत, मोलमजुरी करत बारावीची परीक्षा पास केली आहे. अशातच रत्नागिरी तालुक्यातून एक सुखद धक्का देणारी घटना समोर आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथील कांबळे कुटुंबियातील तिघांनी बारावीची परीक्षा देत उत्तीर्ण झाले आहेत. याहून विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे या कुटुंबातील मुलग्यासह आई -वडील ही एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत. राजन कांबळे (४९) व रोहित कांबळे (१९) अशी या दोघा पिता पुत्राची नावे आहेत. तर रुचिता कांबळे (३८) असे आईचे नाव आहे.