दापोलीतील दांपत्याने सांगितला थरारक अनुभव
रत्नागिरी:- केवळ दैव बलवत्तर आणि आई भवानीच्या कृपेमुळे कोल्हापूरमधील २८ जणांचा पर्यटक गट एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावला आहे. या गटात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील पती-पत्नी शिवप्रसाद चौगुले आणि प्रियांका चौगुले यांचाही समावेश होता. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दुःखद घटनेच्या अगदी दोन ते तीन किलोमीटर अंतरावर हा संपूर्ण गट आणि चौगुले दाम्पत्य होते. या हृदयद्रावक घटनेनंतर सुखरूप राहिलेले शिवप्रसाद चौगुले आणि त्यांची पत्नी प्रियांका चौगुले यांनी या भयावह अनुभवांबद्दल माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून गेलेला २८ जणांचा हा गट पहलगामच्या परिसरात पर्यटनासाठी गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या ठिकाणापासून केवळ काही किलोमीटरच्या अंतरावरच या गटाचे वास्तव्य होते. घटनेची माहिती मिळताच या गटातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही.
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना शिवप्रसाद चौगुले आणि प्रियांका चौगुले यांनी सांगितले की, “आई भवानीची कृपा आणि नशीब बलवत्तर असल्यामुळेच आम्ही या संकटातून सहीसलामत बाहेर पडलो आहोत. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्याच्या अगदी जवळ आम्ही होतो, हे आठवूनही अंगावर काटा येतो. देवाचे आणि आई भवानीचे खूप खूप आभार.” या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र कोल्हापूरच्या या गटातील सर्व सदस्य सुरक्षित आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी, चौगुले दाम्पत्याने आणि त्यांच्यासोबतच्या इतर सदस्यांनी दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.