रत्नागिरी:- वंशाचा दिवा मुलगा हवा म्हणाऱ्यांच्या डोळ्यात एक अंजन घालणारी बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात आईच्या निधनानंतर मुलीनेच स्मशानभूमीत जावून अंत्यसंस्कार केले.
आईवर मुलीने केले अंत्यसंस्कार
स्नेहलता माने यांचं वयाच्या 80 वर्षी 3 फेबुवारीला निधन झाले. पण स्नेहलता यांना मुलगा नाही, तर चारही मुली. स्नेहलता यांचा पतीचं यापूर्वीच निधन झालं आहे. त्यानंतर पदरातील चार मुलींना स्नेहलता यांनी आधार देत लहानाचं मोठं केलं. दरम्यान 3 फेबुवारीला स्नेहलता यांचं निधन झालं. मुलगा नसल्याने या मातेला अग्नी देणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला. पण न डगमगता स्नेहलता यांची तीन नंबरची मुलगी सविता लाखाटे यांनी आपल्या आईला अग्नी देऊन मुलगी सुद्धा वंशाचा दिवा आहे हे दाखवून दिलं. थेट स्मशानभूमीत जावून या मुलीने आईच्या अंत्यविधीचे सर्व कार्य पुर्ण केले आणि आईच्या चितेला मुखाग्नी दिला.