आंब्यावर तुडतुड्या पाठोपाठ लाल कोळीचा प्रादुर्भाव

रत्नागिरी:- ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होत असून तुडतुड्या पाठोपाठ लाल कोळीचाही प्रादुर्भाव काही बागांमध्ये झालेला आहे. हा कोळी पानातील रस शोषून घेत असल्यामुुळे पाने गळून जातात. त्याचा मोहोरावरही परिणाम होत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फवारण्यांचा हात मारावा लागत आहे.

गेले पंधरा दिवस सतत उन्हाचा कडाका आणि ढगाळ वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. सलग चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे जानेवारीच्या सुरवातीला तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला होता; मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश आले आहे. थंडीच्या अभावामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया खंडित झालेली आहे. विचित्र हवामानाच्या परिणामामुळे काही बागांमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा कोळी आंब्याच्या पानांमधील रस शोषून घेतो. पाने करपून जातात आणि ती गळून पडतात. ही कीड मोहोरालाही घातक बनलेली आहे. बागेमध्ये काही झाडांवर लाल कोळी दिसून आला. एका झाडापासून तो तीन मीटर अंतरावर उडू शकतो. त्यामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव झालेल्या झाडापासून जवळ असलेल्या 25 झाडांवर औषधांची फवारणी करावी लागते. पावसमधील तीन बागांमधील काही झाडांवर हा कीटक सापडला. औषध फवारणी केली आहे. एका फवारणीसाठी 2 हजार रुपयांचे औषध लागते. तापमानातील बदलांमुळेच हा रोग उद्भवला आहे.