रत्नागिरी:- जिल्ह्यात हापूसवरील फूलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. फूलकिडींमध्ये कीटकनाशकांप्रती प्रतिकारक्षमता व किडीची प्रजननक्षमता वाढली आहे. त्यामुळे कीटकनाशकांचा किडीवर अपेक्षित परिणाम होत नाही, असा प्राथमिक अंदाज कोकण कृषी विद्यापिठाच्या संशोधकांनी अभ्यासाअंती काढला आहे. फूलकिडी नियंत्रणासाठी गोळप व कळंबट येथील एक एकर बागेत प्रयोग सुरू असून तिथे वापरण्यात आलेल्या औषधांचा परिणाम थ्रिप्स नियंत्रणात येत आहे. याला कोकण कृषी विद्यापिठाचे संशोधक डॉ. व्ही. एन. जालगावकर यांनी दुजोरा दिला आहे.
कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या झालेल्या बैठकीत फूलकिडीवरील नियंत्रणाविषयी चर्चा झाली. त्यानंतर विद्यापिठाने संशोधनाला सुरवात केली आहे. आंबापिकावर पिवळ्या व काळ्या अशा दोन प्रकारच्या फूलकिडींच्या प्रजाती दिसत आहेत
. त्यामध्ये अनुवांशिक बदल झाला आहे का, यावर विद्यापिठामार्फत संशोधन चालू आहे. बाजारात आंब्यावरील फूलकिडींसाठी कोणतेही प्रभावी लेबल क्लेम कीटकनाशक नसल्यामुळे विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंब्यावरील फूलकिडींच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबट (दापोली) व गोळप (र
त्नागिरी) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा (मालवण) व फणसे (देवगड) येथे फूलकिडीच्या नियंत्रणासाठी बाजारपेठेत इतर पिकांवर फूलकिडींसाठी प्रभावी असलेली कीटकनाशके वापरून प्रायोगिक प्रक्षेत्र चाचणी प्रात्यक्षिके सुरू केली आहेत. या हंगामाअखेर त्याचे निष्कर्ष उपलब्ध होतील. गोळप येथील प्रक्षेत्रात चाचणी प्रय
ोग प्रात्यक्षिकांमध्ये वापरण्यात आलेल्या कीटकनाशकांचे आशादायक निष्कर्ष प्राथमिक स्वरूपात दिसून येत असून फूलकिडीचा फळावरील प्रादुर्भाव कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्रात्यक्षिक पूर्ण झाल्यावर याबाबत सविस्तर निष्कर्ष पुढे येतील.
कीटकांमध्ये जनुकीय बदल शक्य
हापूस आंबा बागेत प्रादुर्भाव झालेल्या फूलकीड ही अतिशय सुक्ष्म असून, तिचा व पिल्लांचा रंग पिवळसर अथवा काळा असतो. मादी कोवळ्या पानांच्या शीरांमध्ये अंडी घालते. पिल्ले व पूर्ण अवस्थेतील फूलकीडे पानाची साल खरवडतात आणि पानातील रस शोषतात. पानाच्या कडा तसेच शेंडे करपतात व पाने वेडीवाकडी झालेली दिसतात. मोहो
रावर देखील या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. फळांवर प्रादुर्भाव झाल्यास फळांची साल खरवडल्यामुळे साल काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते. ही कीड सुक्ष्म असल्यामुळे आंबा बागायतदारांनी आंबा मोहोर व फळांचे काळजीपूर्वक सर्वेक्षण करून किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे का, याची पहाणी करून वेळीच उ
पाययोजना कराव्यात. ज्या शेतकर्यांनी आवश्यकतेनुसार व एकाच कीटकनाशकाची फवारणी केली त्या बागेस प्रादुर्भाव कमी प्रमाणात व नियंत्रणात आहेत. कीटकांमध्ये जनुकीय बदल झाल्याची शक्यता तपासली जात आहे.
किडींचे व्यवस्थापन असे करा
या किडींच्या व्यवस्थापनाकरिता विद्यापिठामार्फत स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही 2.5 मिली किंवा थायोमेधाक्झाम 25 टक्के 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. (कीटकनाशके लेबल क्लेम नाहीत); परंतु सद्यःपरिस्थिती बाजारात उपलब्ध असलेले कुठलेही कीटकनाशक फूलकिडीच्या नियंत्र
णासाठी प्रभावी नाही, असे विद्यापिठाकडून सांगण्यात आले.
थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील आंबा बागायतदार अडचणीत आला आहे. या रोगावरील नियंत्रणासाठी विद्यापिठाने दोन एकर क्षेत्रावर संशोधन सुरू केले आहे. अन्य पिकावर थ्रिप्स नियंत्रणात आलेल्या औषधांचा वापर करून पाहिला जात आहे. हा प्रयोग सकारात्मक आहे.
- –डॉ. व्ही. एन. जालगावकर, संशोधक, कोकण कृषी विद्यापीठ