लांजा:- लांजा तालुक्यातील गोविळ मधलीवाडी येथे आंबा काढण्यासाठी झाडावर चढलेल्या ५१ वर्षीय सुहास गंगाराम लाखण यांचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दि. ०५ मे रोजी सायंकाळी ४.०० वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुहास लाखण हे त्यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढले होते. दरम्यान, त्यांनी एका फांदीचा आधार घेतला असता ती फांदी अचानक तुटली. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते खाली जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत त्यांना गंभीर मार लागला.
घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी तातडीने भांबेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे गोविळ मधलीवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.