आंबा व्यावसायिकांचे प्रश्न 15 वर्ष जैसे थे

रत्नागिरी:- सध्या आंबा शेती करणे फारच खर्चिक झाले आहे. शेतकर्‍यांचे बेसिक प्रश्‍नच सुटलेले नाहीत. मागील 15 वर्षात आंबा शेतीची प्रगती झाली नसल्याची चर्चा शनिवारी टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये झालेल्या आंबा बागातदारांच्या वार्षिक सभेत करण्यात आली.

यावेळी संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, ज्येष्ठ बागायतदार तुकाराम घवाळी, बावा साळवी, सतीश शेवडे आदी उपस्थित होते. काकासाहेब मुळ्ये यांनी आंबा शेतकर्‍यांचे विविध प्रश्‍न मांडले. कॅनिंगला पाठवण्यात येणार्‍या तीन नंबर आंब्याचा दर अवघा 10 ते 12 रुपये एवढाच मिळतो. फवारणीच्या पंपासाठी रॉकेल मिळत नसल्याने 90 रुपये लिटर दर असलेले पेट्रोल वापरावे लागते. कोकणात वानरही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यामुळे शेतकर्‍यांनी शेती करणे सोडले. यामुळे हे वानर आंबा, काजू पिकांकडे वळले असून, आंबाबागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. औषध कंपन्या आणि औषध विक्री दुकानांवर सरकारचे नियंत्रण नाही. त्यामुळे किमती भरमसाट वाढवण्यात आल्या आहेत. 1 हजार, 2 हजार, 3 हजार रुपये लिटर किंमत असलेली औषधे फवारूनही त्याचा परिणाम होत नाही. मुळात या औषधामधील कंटेन्ट तपासणी करणारी यंत्रणाच प्रभावशाली नाही. यापूर्वी जी औषधे उपयुक्‍त ठरली होती त्या औषधांवर सध्या बॅन लावण्यात आले असल्याचे ज्येष्ठ बागायतदार काकासाहेब मुळ्ये यांनी सांगितले. फक्‍त आंबापिकांसाठी एखादे औषध तयार करण्यात आलेले नाही. कृषी विद्यापिठांनी यावर संशोधन करणे गरजेचे असल्याचे, मत रत्नागिरीचे मंगेश साळवी यांनी व्यक्‍त केले.

कर्जमाफी हा बँकांच्या अखत्यारितला विषय आहे. यादी उपलब्ध नाही, असे सांगून मागील तीन वर्षे बँका शेतकर्‍यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत आहेत. या विषयावरही चर्चा करण्यात आली. आंबा बागायतदार राजेंद्र कदम यांनी पिक विमा निकष बदलण्याची मागणी केली. कोकणची भौगोलिक परिस्थिती पाहता पिक विम्याचे निकष कोकणासाठी वेगळे असवेत, असे सांगितले. या प्रश्‍नांबरोरच शेतकर्‍यांच्या बेसिक प्रश्‍नांवरही चर्चा करण्यात येऊन सर्वांनी एकजूट व्हा, असे आवाहनही करण्यात आले.