लांजा:- आंबा बागेत गवत कापण्याचे काम करत असताना साप चावल्याने ५४ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लांजा तालुक्यातील बेनी येथे घडली आहे.
याबाबत मिळालेला माहितीनुसार लांजा तालुक्यातील खेरवसे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले चंद्रकांत सिताराम धनावडे (वय ५४) हे सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता बेनी येथील आंबा बागेत गवत साफसफाई करण्याचे काम करत होते. यावेळी त्यांच्या पायाला सापाने कडकडून चावा घेतला. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सापाला झटकले होते . आपल्याला साप चावल्याची माहिती त्यांनी दिल्यानंतर त्यांना तातडीने दुपारी १२.४० वाजता लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांची तब्येत चांगली होती. ते सर्वांशी बोलत होते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना सर्पदंशावरील इंजेक्शन देखील देण्यात आले होते.काही वेळातच चंद्रकांत धनावडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
चंद्रकांत धनावडे यांच्या दुर्दैवी मृत्यूने खेरवसे -बेनी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत धनावडे यांच्या पक्षात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे .सोमवारी सायंकाळी लांजा ग्रामीण रुग्णालयात चंद्रकांत धनावडे यांचे सेवाविच्छेदन करण्यात आले.