आंबा बागायतदारांना थकित कर्ज वसुलीसाठी जप्तीची कारवाई करू नका

पालकमंत्री ना. सामंत यांच्या बँकांना सूचना 

रत्नागिरी:- बँकांनी आंबा बागायतदारांना थकित कर्ज वसुलीसाठी जप्तीची कारवाई करू नये. तसेच शेती पंपाच्या थकित बिलापोटी वीज पुरवठा कापू नये असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर रत्नागिरीत आंबा बागायतदारांच्या समस्यांविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी बागायतदारांशी चर्चा करुन महावितरणसह बँक ऑॅफ इंडिया, जिल्हा उपनिबंधक यांना सुचना दिल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंग, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह आंबा बागायतदार प्रदीप सावंत, टी. एस. घवाळी, बावा साळवी, प्रसन्न पेठे, डॉ. विवेक भिडे, कृषी अधिकारी, महावितरणचे अधीक्षक अभियंता, पणन मंडळ सरव्यवस्थापक, जिल्हा उपनिबंधक, बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे 2015-16 साली आंबा बागायतींचे मोठे नुकसान झाले होते. बागायतदारांना मदत देण्यासाठी तत्काळ सर्व्हेक्षणाच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. जिल्ह्यातील सर्वच आंबा बागायतदारांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून दिला गेला होता. त्यावेळी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्याचे व्याज आणि बागायतदारांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठनावरील पहिल्या एक वर्षाचे व्याज शासनाने माफ केले. परंतु बँकांकडून त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही झाली नव्हती. याचा आढावा जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. तेव्हा महसूल विभागाने यादी दिली नसल्याचे बँकांकडून सांगण्यात आले. तसेच बागायतदारांनी फॉर्म भरुन द्यावा असे सांगितले. यावर बागायतदारांनी प्रत्येक बँकांनी कर्जदार शेतकर्‍यांची यादी आम्हाला द्या, जेणेकरुन तीन महिन्याचे व्याज आणि पुनर्गठीत कर्जावरील वर्षभराचे व्याज याचा एकत्रित जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला जाईल. हा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयामाफत पाठवला जाईल. तशी यादी देण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बँकांना दिले असून 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत थकित बागायतदारांवर बँकांकडून होणारी जप्तीची कारवाई तात्काळ थांबवावी अशाही सुचना दिल्या. जे बागायतदार पैसे भरण्यास तयार आहेत, त्यांना मुदत द्या असेही सांगितले. त्यामुळे कारवाईमुळे त्रस्त झालेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे.
महावितरणने वीजबिल वसुलीसाठी आंबा पिक हे अदर अ‍ॅग्रीकल्चर या प्रकारात समाविष्ट केले आहे. त्यामुळे कोकणातील मुख्य पीक असलेल्या आंबा, काजूला मोठा फटका बसला आहे. अनेक बागायतदारांनी घेतलेल्या कृषी पंपांची वीजबिले अडीचशेवरुन दहा हजारापासून लाखावर गेली. थकलेली बिले वसुलीसाठी महावितरणकडून वीज जोडण्या कापण्यास सुरवात केली. हा विषय मार्गी लागणार असल्याने महावितरणने वीज जोडण्या कापू नयेत असे निर्देश मुख्य अभियंत्यांना दिले.