संगमेश्वर:- तालुक्यातील रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातील दख्खनजवळ दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी मध्यरात्री साडे बारा ते एकच्या दरम्यान झाला.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुदास इरानाथ चारखाने हा आपल्या ताब्यातील (KA- 48– A1434) हा ट्रक घेऊन जयगड ते कोल्हापूर असा कोळसा भरून जात होता. ट्रक आंबा घाटातील दख्खनजवळ आला असता कोल्हापूरहून रत्नागिरीकडे साखर भरून येणाऱ्या ट्रकवर आदळला. ( MH- 11- F5161) हा ट्रक माणिक भिकाजी सुतार चालवत होता . झालेल्या अपघातात अडकून पडलेल्या चालकांना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. यात गुरुराज इरानाथ चारखाने हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला प्रथम साखरपा आरोग्य केंद्रात आणून उपचार करण्यात आले. मात्र डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार तास वाहतूक ठप्प होती. अपघाताचे वृत्त समजताच साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस हेड कॉन्स्टेबल राहुल गायकवाड, कॉन्स्टेबल वैभव कांबळे, महिला पोलिस नाईक हेमलता गोतावडे यांनी धाव घेऊन प्रथम जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. चार तास ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली.