रत्नागिरी:- गेले जवळपास तीन महिन्यांपासून बंद असलेली आंबा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक अखेर शुक्रवारपासून सुरु करण्यास एका विशेष बैठकीत परवानगी देण्यात आली आहे .
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत खासदार विनायक राऊत यांच्या सुचनेनुसार संबंधित खात्याशी चर्चा करुन सदर निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे .अवजड वाहतूकदार , प्रवासी वर्ग आणि शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेच्या मागणीला या निर्णयामुळे यश आले आहे.आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीस संबंधित खात्याचे सर्व अधिकारी तसेच आमदार राजन साळवी , आमदार योगेश कदम , शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके ,माजी आमदार सुभाष बने , जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव , माजी अध्यक्ष रोहन बने संगमेश्वरचे सभापती जयसिंग माने , लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव , योगेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.या विषयाचा योग्य पाठ पुरावा करुन घाट सुरु केल्या बद्दल संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव यानी सर्व शिवसेना नेत्यांचे आभार व्यक्त केले आहेत . आंबा घाटातील वाहतूक बंद झाल्यामुळे प्रवासीवर्ग , अवजड वाहतूकदार कोकणातील शेतकरी , लाकूड व्यापारी , चिरे खाण व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला होता . यामुळे पैसा, वेळ आणि इंधन याचा मोठा अपव्यय होत होता . या निर्णयाचा सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . तब्बल तीन महिने आणि सात दिवसांनी अवजड वाहतूकीसाठी आंबा घाट रस्ता आता खुला झाला आहे.