आंबा, काजू बागायतदारांना 84 कोटी 71 लाखांचा परतावा

18 हजार 529 शेतकऱ्यांना दिलासा 

रत्नागिरी:- वातावरणातील बदलामुळे मागील हंगामात आंबा, काजूपिकाचे उत्पादन 50 टक्केच आले होते. त्यात कोरोनामुळे वाहतूक यंत्रणेचा अडथळा निर्माण झालेला होता. त्यांना विमा कंपनीने दिलासा दिला असून 18 हजार 529 बागायतदारांना 84 कोटी 71 लाख रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

हवामानावर आधारित विमा योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक नुकसानीची पूर्णतः झळ बसून नुकसान होऊ नये म्हणून विम्याचा लाभ दिला जातो. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या विभागातील प्रामुख्याने आंबा, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आंबा, काजूच्या उत्पादनावर पाऊस, कमी-जास्त तापमान, वेगवान वारे, गारपीट या हवामान धोक्यापासून फळपिकांना निर्धारित कालावधीत शेतकर्‍यांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. रत्नागिरी विभागासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती केली. गेली सहा वर्षे आर्थिक नुकसानीची हानी टाळण्यासाठी विमा काढण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढलेला आहे.

तीन महिन्यांनी आंबा, काजू शेतकर्‍यांना विमा परतावा मंजूर झाला आहे. काजूसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजार 740 शेतकर्‍यांनी 2259 हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता. त्यापोटी 96 लाख 4 हजार प्रीमिअम भरला होता. त्यातील 371 शेतकर्‍यांना परताव्यापोटी 38 लाख 22 हजार रुपये मिळतील; परंतु काजू शेतकर्‍यांना परताव्याचा कमी मिळाला आहे. तसेच 18 हजार 158 आंबा बागायतदारांनी 14 हजार 755 हेक्टरसाठी 8 कोटी 92 लाख रुपये प्रीमियम भरला. सर्वच्या सर्व बागायतदारांना परतावा मिळाला असून 84 कोटी 33 लाख रुपये बँक खात्यात जमा होतील. वातावरणातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीत परताव्याचा लाभ बागायतदारांसाठी वरदान ठरणार आहे.

दरम्यान, गतवर्षी जानेवारी अखेरीस मोठी तापमान घट झाली होती. तसेच मे महिन्यात बहुतांश ठिकाणी अवेळी पाऊस झाला. निकषानुसार जानेवारी अखेरीस कमी तापमान होते. मार्च महिन्यात तापमानात वाढ झालेली होती. या बदलामुळे आंबा, काजूच्या उत्पादनात घट झाली. त्यामुळे यंदा शेतकर्‍यांना परताव्याचा लाभ मिळेल असा अंदाज होता. कोरोनामुळे सुरवातीला विक्री यंत्रणा कोलमडण्याची भीती होती. कालांतराने हा प्रश्न सुटला आणि आंबा व्यापार्‍यांना दिलासा मिळाला