रत्नागिरी:- फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २६ हजार ६१३ आंबा, काजू बागायतदारांना २७ कोटी ४७ लाख ७० हजार ६२४ रुपयांचा विमा परतावा मंजूर झाला आहे. ही रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात थेट भरली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्यामुळे हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र सरकारने जाहीर केली. त्यानुसार गतवर्षी जिल्ह्यातील २२ हजार ३८२ बागायतदारांनी मिळून १४ हजार ७३४ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता. गतवर्षी आंबा, काजू हंगामाच्या दुसर्या व तिसर्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर फुलोरा आला होता; परंतु बदलत्या हवामानामुळे फळधारणा झालेली नव्हती. पाऊस आणि उच्च तापमान यामुळे फळगळीही प्रचंड झाली होती. डिसेंबर व जानेवारी महिन्यात अवकाळीचा फटका बसला. पुढे फेब्रुवारीत निचांकी तर मार्चमध्ये पुन्हा उच्चतम तापमानामुळे पिकांचे नुकसान झाले. सुरवातीला उत्पादन कमी असल्यामुळे बाजारात दर होता. पुढे एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा दर कोसळला. त्याचाही फटका बागायतदारांना बसला. उत्पादन कमी राहिल्यामुळे अपेक्षित नफा-तोट्याचा ताळेबंद राखण्याचे बागायतदारांपुढे मागील हंगामात आव्हानच राहीले. तीन ते चार वाढीव फवारण्यांचा खर्चाची भर पडल्याने बागायतदारांचे गणित कोलमडले. विमा लाभांशाचा आधार बागायतदारांना होता. नुकताच विमा परतावा संबंधित कंपनीकडून जाहीर करण्यात आला आहे. ३ हजार ७८० काजू बागायतदारांसाठी ९ कोटी ४५ लाख १८ हजार ५७६ तर १८ हजार ७०८ आंबा बागायदारांसाठी १८ कोटी २५ लाख २ हजार ४८ रुपयांची परतावा मिळणार आहे. विमा कंपनीकडून बागायतदारांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा करण्याचे काम सुरु झाले आहे; मात्र जिल्ह्यातील महसूल मंडळातील किती शेतकरी पात्र ठरले, किती परतावा प्राप्त झाला याची माहिती कंपनीकडून दिलेली नाही. दरम्यान काजू उत्पादकांना परतावा पूर्ण हंगामाचा जाहरी करण्यात आला आहे. परंतु आंबा उत्पादकांसाठी अवेळी पाऊस आणि निचांक तापमान यामुळे झालेल्या नुकसानीबाबत परतावा दिला आहे. अजुनही उच्चतम तापमानामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे बागायतदारांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.









