रत्नागिरी:- आंबा, काजू व्यावसायिकांना संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध समस्या सोडवण्यासाठी गेली सात वर्ष सातत्याने सरकार दप्तरी खेटे मारुनही काही उपयोग होत नसल्याने अखेर आंबा व्यावसायिक हतबल झाले आहेत. शासनाने 1200 कोटी दिल्यास आंबा बागायतदारांचे सर्व प्रश्न धसास लागू शकतात. परंतु आंबा बागायतदारांचे प्रश्न कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची खंत व्यक्त करताना, यापुढे लढा तीव्र करण्याचा इशारा देताना 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बागायतदारांनी दिली.
रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेला कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सह. संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, नंदकुमार मोहीते, सचिन आचरेकर यांनी माहिती दिली.
आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर कोकणातील आमदार, खासदार एकत्र येताना दिसत नाही. त्यामुळेच येथील प्रश्न जैसेथेच आहेत. गेली सात वर्ष कर्जमुक्तीसाठी आंबा व्यावसायिक धडपडत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावतो असे सांगून आता स्थानिक आमदार तसेच पालकमंत्री उदय सामंत यांना एक वर्ष होत आले आहे. याबाबत बागायतदारांनी थेट नाराजी व्यक्त केली. निवडणुका जवळ येत आहेत, आंबा उत्पादकांना कुणीही कमी लेखू नये असेही बागातदारांनी सांगितले.
आंबा, काजूच्या छोट्यामोठ्या उत्पादकांची संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे,शेतकर्यांचे सातबारा उतारे कर्जमुक्त झाले पाहिजेत. फळबागायतदारांच्या विम्याचे निकष बदलले पाहिजेत. आंबा बागायतदारांना कृषीपंपानुसार बिल आले पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. आंब्यावर पडणारे रोग याचा अभ्यास करण्यासाठी कृषी विद्यापिठाचे केंद्र रत्नागिरीत व्हावे अशी मागणी केली जात आहे, परंतु अद्याप त्यावर निर्णय झालेला नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शेतकर्यांच्या या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मंगळवार 25 जुलै रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून काही मार्ग न निघाल्यास, पुढील आंदोलने तीव्र करण्याचा विचार बागायतदारांनी व्यक्त केला. या मोर्चा रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा सह. संस्था, मंगलमुर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, पावस परिसर आंबा सह. संस्था, ओबीसी संघर्ष समन्वय समिती, बहुजन विकास आघाडी यांच्यामाध्यमातून काढला जाणार आहे.
यावेळी बागायतदार मंगेश साळवी, मन्सुर काझी, अमृत पोकळे, किरण तोडणकर, अशोक भाटकर, प्रल्हाद शेट्ये, ज्ञानेश पोतकर आदी आंबा बागायतदार उपस्थित होते.