आंबवली येथे वृध्दाची गळफास लावून आत्महत्या

खेड:- खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गंगाराम केंडे (वय ५६), रा. आंबवली, भिंगारवाडी (ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बुधवार, दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. केंडे यांनी आपल्या गुरांच्या गोठ्यातील पोटमांड्याच्या लाकडी वाशाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आपले जीवन संपवले.

​या घटनेची माहिती मृताचे चुलत भाऊ धोंडीराम नामदेव केंडे यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ​आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.