आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील 18 शिक्षकांचे बदली रद्दचे प्रस्ताव

रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत 725 शिक्षकांपैकी 18 जणांनी बदली रद्दचे प्रस्ताव सादर केले आहेत. याबाबत मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

ऑगस्ट महिन्यात आंतरजिल्हा बदलीसाठी पात्र ठरलेल्या शिक्षकांची यादी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाली होती. त्यावरील कार्यवाही शासन निर्णयानुसार 30 एप्रिलपर्यंत करावयाची होती. रत्नागिरीतील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे अधिक असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कार्यवाही काही दिवस विलंबाने झाली होती; मात्र पात्र शिक्षकांना बदलीच्या ठिकाणी तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले गेले होते. जिल्ह्यातील 22 शिक्षकांनी प्रस्ताव नाकारले. त्यातील तिन शिक्षकांना ऑफलाईन पध्दतीने बदलीचे सुधारित आदेश प्राप्त झाल्याने ते संबंधित शाळांवर रुजू झाले. त्यांनी नगरपालिका क्षेत्रातील शाळांची मागणी केली होती. उर्वरित 18 शिक्षकांच्या बदली रद्दच्या प्रस्तावावर शिक्षण विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे चर्चा करण्यात आली. निर्णय काय घ्यायचा याबाबत ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतरच प्रस्ताव रद्दवर विचार केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदल्यांची यादी जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये रद्दचा प्रस्ताव सादर करावयाचे असतात. बदली रद्दची मागणी करणार्‍या काही शिक्षकांनी आम्ही तालुका शिक्षण विभागाकडे वेळेत प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले आहे. त्याची पडताळणी जिल्हास्तरावरुन केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.