आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत जि. प. ला 25 लाख 50 हजारांचे अनुदान

रत्नागिरी:-आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला २५ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यामुळे ५१ लाभार्थ्यांना त्याचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याण सभापती पर्शुराम कदम यांनी दिली.

समाजामधील अस्पृश्यता नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत जातीचा उंबरठा ओलांडणार्‍या जोडप्यांना ५० हजार रूपये तर २०१० पूर्वी विवाह झाला असेल आणि त्या जोडप्याने या योजनेचा अद्याप लाभ घेतलेला नसल्यास त्या जोडप्याला १५ हजार प्रोत्साहन अनुदान दिले जाते. यातील ५० टक्के केंद्र व उर्वरित ५० टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते.
या योजनेचा रत्नागिरीतील अनेक जोडपी लाभ घेताना दिसत आहेत. २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षात ५१ जोडप्यांनी जातीचा उंबरठा ओलांडून आंतरजातीय विवाह केला आहे. या जोडप्यांचे परिपूर्ण प्रस्ताव जि. प.च्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले होते. गतवर्षी निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २५ लाख ५० हजार रूपये जि. प.ला प्राप्त झाले आहेत. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम घेण्यात आलेला नसून, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या जोडप्यांना थेट निधी दिला जात आहे. आतापर्यंत २३ जणांनी याचा लाभ घेतला आहे. यंदा ६ प्रस्ताव आले आहेत. अजून प्रस्ताव असल्यास संबंधितांनी तालुकास्तरावर सादर करावा, असे आवाहन श्री. कदम यांनी केले आहे.