रत्नागिरी:- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून मिळणार्या प्रोत्साहनपर अनुदानाची गेल्या 3 वर्षांपासून प्रतिक्षा होती. राज्यसरकारकडून या योजनेसाठी असलेला 50 टक्के हिस्सा जमा करण्यात आला होता. पण केंद्र सरकारकडून येणारा 50 टक्के हिस्सा न आल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावकर्त्या जोडप्यांना हे अनुदान प्राप्त होताच 153 दाम्पत्यांना सुमारे 75 लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले.
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहनपर शासनाकडून अनुदान दिले जाते. समाजात सवर्ण आणि मागासवर्गीय असा भेदभाव दूर व्हावा व या दृष्टिकोनातून शासनाने ही योजना सुरू केली आहे. समाजातील जातीयता नष्ट करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्सहनपर रक्कम दिली जाते. पूर्वी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना 15 हजार रुपये अनुदान देय होते. यात बदल करून शासनाने रक्कमेत वाढ केली आहे. आता लाभाची रक्कम 50 हजार रुपये दिली जात आहे. अशी जोडपी या योजनेचा लाभ घेण्यासाठी समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करत असतात.
रत्नागिरी समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्यामार्पत आंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान रखडलेले होते. सन 2017-18 व सन 2018-19 या वर्षातील योजनेकरीता 50 टक्के केंद्र सरकारकडून अनुदान प्राप्त झालेले नव्हते. त्यामुळे जिल्हाभरातून समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झालेले 158 पस्ताव प्रलंबित होते. हे अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी जि.प.अध्यक्ष रोहन बने, समाजकल्याण सभापती सौ. ऋतुजा जाधव यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे या योजनेकरता केंद्र व राज्य हिस्सा मिळून एकूण 75 लाख इतके अनुदान प्राप्त झाले. त्या अनुदानातून 50 हजार प्रमाणे 148 जोडप्यांना तर 15 हजार रु. प्रमाणे 5 जोडप्यांना एकूण 74.75 लाख इतके अनुदान मंजुर करण्यात आले.
जिल्हाभरातील संबंधित दांम्पत्यांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करून व उपस्थिती नोंदवून हे अनुदान संबधित बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रकिया चालू आहे. आतापर्यंत 58 लाभार्थ्याना अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. नुकतेच कागदपत्र पडताळणीसाठी आलेल्या जोडप्यांचा सत्कार जि.प.अध्यक्ष रोहन बने, समाजकल्याण सभापती ऋतुजा जाधव, बांधकाम व आरोग्य सभापती महेश उर्प बाबू म्हाप, जि.प.सदस्या सौ. रचना महाडिक, जि.प. समाजकल्याण अधिकारी डाॅ. यतीन पुजारी, समाज कल्याण निरीक्षक कांचन वाघमारे यांच्या पमुख उपस्थितीत जि.प.अध्यक्ष दालनात पार पडला.