लवकर निदान, लवकर उपचार संकल्पना
रत्नागिरी:- कोरोना बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहे. लवकर निदान, लवकर उपचार अशी या मोहिमेत आरोग्य विभागामार्फत कोरोना तपासणी आपल्यासाठी उपक्रम राबविली आहे. यामध्ये मोफत अॅन्टीजेन तपासणीसाठी दोन ‘मोबाईल व्हॅन’ रत्नागिरी शहर आणि परिसरात तैनात केल्या आहेत. गर्दी आणि हॉटझोनमध्ये अॅण्टीजेन तपासण्या करण्यात येणार आहेत.
कोरोना बाधिताचा आकडा पाच हजारावर पोचला आहे. आतापर्यंत 60 टक्के रुग्ण बरे झाले आहेत; मात्र मृत्यूदर तीन ते साडेतीन टक्क्यापर्यंत आहे. गेल्या काही दिवसात हा दर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारा डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये अॅण्टीजेन तपासणीवर भर दिला गेला आहे. रत्नागिरी तालुक्यात मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मोफत अॅण्टीजेन तपासणीसाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे दोन पथके कार्यरत झाली आहे. ही पथके कोरोना सदृश्य लक्षणे (उदा. ताप, सर्दी, घशाला खवखव, कोरडा खोकला, धाप लागणे, ओठ निळे पडणे, अशक्तपणा आदी) असणार्यांची तपासणी करणार आहेत. शहर आणि परिसरातील कोरोना हॉटझोनमधील गर्दीची ठिकाणे निवडून तेथील स्वयंस्फुर्तीने आलेल्या लोकांची तपासणी करणार आहेत. वेळीच निदान करुन शंकानिरसन करण्यासाठी अॅन्टीजेन टेस्टींग सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले आहे.
हा उपक्रम कोरोना मुक्तीसाठी अतीशय प्रभावी ठरणार आहे. त्वरीत निदान झाल्यामुळे उपचार करणे शक्य असून मृत्यूपर्यंत जाणार्या रुग्णांचा आकडो त्वरीत कमी होऊ शकतो. या चाचणीसाठी 504 रुपये खर्च येतो. परंतु शासनाकडून ही सुविधा पूर्णतः मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मृत्यू दर कमी झाला की आपसूकच कोरोनावर मात करणे शक्य आहे. त्यासाठीच ही दोन फिरती पथके नियुक्त करण्यात आली आहेत. बुधवारी (ता. 9) या व्हॅन कार्यरत झाल्या आहेत. रत्नागिरी शहरात केलेल्या तपासणीत एक रुग्ण पॉझीटीव्ह आढळला आहे. सध्या रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरात व्यापार्यांच्या तपासणीसाठी एक पथक कार्यरत आहे. त्याप्रमाणेच चिपळूणातही एक पथक कार्यरत आहे.