जिल्हाधिकारी ; मंडणगडमधील प्रकार, दुसऱ्या कंपनीची नियुक्ती
रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील कोरोना चाचणी अहवाल देण्यास विलंब करणाऱ्या मायलॅब कंपनीचे काम प्रशासनाने थांबविले आहे. जिल्हा प्रशासनाने ही कारवाई केली आहे. शासनाने त्याऐवजी दुसऱ्या कंपनीची नियुक्ती केल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. तो रोखण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. दिवसाला तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये ५०० ते ६०० कोरोना बाधित मिळत आहेत. चाचण्यांमध्ये बाधित सापडून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार होणे अपेक्षित आहे. तरच संसर्ग रोखता येणार आहे. त्यासाठी मंडणगड तालुक्यातील २५ मे रोजी सुमारे ४०० जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल दोन किंवा तीन दिवसात मिळणे अपेक्षित होते. मात्र २ जूनला म्हणजे आठ दिवसानंतर अहवाल मिळाले. त्यापैकी १७८ जणांचा अहवाल बाधित आले. या दरम्याने हे सर्व आठ दिवस निर्धास्तपणे फिरत होते. संसर्ग वाढविण्यास ही कृती कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची झोप उडाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी यांची गंभीर दखल घेतली. संबंधित एजन्सीला गुन्हा दाखल करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मंडणगड येथील प्रकाराची गंभीर दखल घेऊन आम्ही त्यांना गुन्हा दाखल करण्याची नोटीस दिली होती. शासनानेही त्याची गंभीर दखल घेऊन मायलॅब कंपनीचे काम थांबविण्यास सांगितले आहे.