असुर्डे येथे भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- मुंबई गोवा महामार्गावरील असुर्डे येथील घाटात स्विफ्ट डिझायरची टेम्पोला मागून बसलेल्या धडकेत स्विफ्ट डिझाईर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला जखमी झाली आहे. सुनील काशीराम आंबेकर (५६, रा. आंबेडबुद्रुक- संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर त्यांच्या पत्नी स्नेहल आंबेकर जखमी झाल्या आहेत.

याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुनील आंबेकर आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर गाडीतून पत्नीसह आंबेडबुद्रुक ते चिपळूणच्या दिशेने येत असताना असुर्डे येथे आले असता उभे असलेल्या टेम्पोला मागाहून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात सुनील आंबेकर यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच असुर्डेतील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संदीपराव सावंत, पंकज साळवी, चेतन नरळकर यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमी स्नेहल आंबेकर यांना डेरवण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यास मदत केली. तर सावर्डे पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव पंचनामा केला. अधिक तपास सावर्डे पोलीस करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनील आंबेकर हे एस. टी. मध्ये कामाला होते. श्री आंबेकर यांच्या घरी लग्नकार्य होते. हे कार्यक्रम आटपून सर्व कुटुंबीयांसह चिपळूणच्या दिशेने येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने आंबेकर कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.