रत्नागिरी:- रत्नागिरीच्या कन्येने जलतरण क्षेत्रात देशात अव्वल स्थान मिळवत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सामान्यतः ज्या वयात मुले खेळण्यात आणि रडण्यात मग्न असतात, त्याच वयात रत्नागिरीतील वेदा सरफरे हिने पाण्याशी मैत्री करत एक थक्क करणारा प्रवास पूर्ण केला आहे. अवघ्या १ वर्ष ९ महिन्यांत तिने १०० मीटरचे अंतर केवळ १० मिनिटे आणि ८ सेकंदांत पूर्ण करून ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले आहे. ती आता देशातील सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे.
वेदाचा मोठा भाऊ रुद्र शासकीय जलतरण तलावात नियमित सराव करतो. त्याची आई पायल सरफरे त्याला घेऊन तलावावर येत असे. आईच्या कंबरेवर बसून वेदा रोज भावाचा सराव पाहत होती. जलतरण तलावाचं वातावरण तिला एवढं सवयीचं झालं की, प्रशिक्षक महेश मिलके यांनी एकदा धाडस करून तिला पाण्यात सोडले. आश्चर्य म्हणजे, ती रडली नाही! उलट, तिने पाण्यावर हातपाय मारून पाण्याशी जवळीक साधली आणि हळूहळू ती पोहायला लागली.
अवघ्या दीड वर्षांच्या आत राष्ट्रीय विक्रमापर्यंत पोहोचलेली वेदा केवळ रत्नागिरीचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची सर्वात लहान जलतरणपटू ठरली आहे. यापूर्वी जगात असा रेकॉर्ड करणाऱ्या बालकामध्ये जपानमधील २ वर्ष ७ महिन्यांच्या बालकाचा समावेश होता. त्यामुळे रत्नागिरीच्या वेदाचा हा रेकॉर्ड जागतिक स्तरावरही अव्वल ठरणार आहे.
वेदाच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर तिचा प्रस्ताव आता एशिया बुक रेकॉर्डसाठी देखील पाठवण्यात आला आहे. तसेच, गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठीही लवकरच तिची नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे प्रशिक्षक महेश मिलके यांनी सांगितले. योग्य वेळी मिळालेले प्रशिक्षण, पालकांचा पाठिंबा आणि प्रशिक्षकांची अचूक नजर यामुळे कोणतंही अवघड काम यशस्वी होऊ शकतं, हेच या चिमुकलीने सिद्ध केले आहे. वेदाच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.









