अवघ्या दहा मिनिटांत रत्नागिरी बाजारपेठ पुन्हा गजबजली

रत्नागिरी:- शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला समर्थन देत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी रस्त्यावर उतरत बाजारपेठ बंद केली. व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहुन दुकान बंद केली. मात्र अवघी दहा मिनिटं बंदला समर्थन देत दुकाने पुन्हा उघडण्यात आली. अवघ्या काही मिनिटात बाजारपेठ पुन्हा गजबजली. 

शेतकरी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत उघडलेली दुकाने शिवसैनिकांनी बंद केली. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असला तरी व्यापाऱ्यांनी मात्र दहा मिनिटे दुकान बंद ठेवत आपला पाठिंबा दर्शवला. दहा मिनिटांनी पुन्हा दुकाने सुरू करण्यात आली. 

मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार पूर्णतः ठप्प होते. मात्र एसटी, रिक्षा आणि अन्य खासगी वाहतूक नियमित सुरू होती. बँकिंग व्यवहार देखील नियमितपणे सुरू होते.