25 वाड्यांना टँकर; तीन तालुक्यातील 2,287 लोकांना आधार
रत्नागिरी:-उन्हाची तिव्रता अधिक असली तरीही जिल्ह्यात अवकाळी गारांच्या पावसामुळे यंदा पाणीटंचाईचे स्वरुप सौम्य राहीले आहे. जिल्ह्यात 20 गावातील 25 वाड्यांना चार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. 2 हजार 287 लोकांना हे पाणी पुरवले जात आहे.
यंदाचा उन्हाळा तिव्र उष्म्याचा होता हे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात पारा 39 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक गेला होता. त्यामुळे कोकणातील हापूसला फटका बसला. वाढत्या उन्हामुळे विहीरींसह पाणी पुरवठा योजनांसाठीच्या बंधारे, धरणातील पाणीसाठ्यांवर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती; परंतु यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्चपाठोपाठ एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. परिणामी खेड, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील टंचाई निर्माण होणार्या गावातील विहीरींसह पाणीसाठ्यांवरील पातळी स्थिर राहीली आहे. परिणामी टंचाईची तिव्रता कमी झाली आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशनमध्ये अनेक गावांचा समावेश करण्यात आला असून पाणी योजनांची कामेही चालू आहेत. सध्या खेड, चिपळूण आणि लांजा या तिन तालुक्यांमध्ये टंचाई जाणवत असून चार टँकरने पाणी दिले जात आहे. दोन खासगी आणि दोन शासकीय टँकरची मदत घेतली जाते. आतापर्यंत 170 फेर्या टँकरने पाणी पुरवण्यात आले आहे. सव्वा दोन हजार लोकांना हे पाणी देण्यात आले आहे. तिन तालुक्यां व्यतिरिक्त सहा तालुक्यात एकही टँकर धावलेला नाही.