चिपळूण, संगमेश्वरला सर्वाधिक; जिल्ह्याला ६२ लाखाचा फटका
रत्नागिरी:-गारांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात ६२ लाखाचे नुकसान झाले आहे. वेगवान वार्यामुळे घरे, गोठे, दुकाने यांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील शेतकर्यांना बसला असून ९९१ हून अधिक शेतकर्यांचे ४०० हेक्टरवरील बागायतींचे नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात गारांसह मुसळधार पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. यामध्ये घरा, गोठ्यांचे मोठे नुकसान झाले. वेगवान वार्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील काही गावातील घरांची छपरे उडून गेली. घरांचे सुमारे ५८ लाखाचे झाले. या व्यतिरिक्त तीन शाळा, पोल्ट्री फॉर्म, शौचालय, मंदिर, दुकान, आरोग्य केंद्र यांनाही या अवकाळीचा तडाखा बसला. जिल्ह्यात सुमारे ६२ लाख ८१ हजार रुपये नुकसान नोंदवले गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत चारशे हेक्टरहून अधिक जमिनीतील फळबागा व शेतीचे नुकसान चिपळूण व संगमेश्वरमध्ये नोंदवण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक आंबा बागायतीला फटका बसला आहे. दोन तालुक्यात ३९२ हेक्टरवरील आंबा बागायतीचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल काजू बागायतीचे ११.५ हेक्टरवर नुकसान झाले आहे. केळी बागायतीलाही या अवकाळीचा फटका बसला आहे. भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. विशेषत: कलिंगडाचे मोठे नुकसान नोंदवण्यात आले आहे. संगमेश्वरमध्ये ६८८ तर चिपळूणमध्ये ३०३ अशा ९९१ शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे आतापर्यंत करण्यात आले आहेत.