खेड:- कोकण रेल्वे मार्गावरील खेड येथील अलसुरे बोगद्यात सोमवारी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. बोगद्यामध्ये केबलचे काम सुरू असताना सावंतवाडीहून दिव्याकडे जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून ५ कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. इतर दोन कामगार किरकोळ जखमी आहेत.
या दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशन आणि अंजनी रेल्वे स्टेशनदरम्यान असणाऱ्या अलसुरे बोगद्यात केबल टाकण्याचे काम सुरू होते. याचदरम्यान दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास तेथून जाणाऱ्या रेल्वेने पाच कामगारांना ठोकर दिली. त्यातील काही कामगार बोगद्याच्या बाहेर येऊन आरडाओरड करू लागले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमी कामगारांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात यशवंत तुकाराम राठोड (५५ वर्षे, रा. हवेरी तांडा, ता. जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक) हा मजूर मृत झाला असून जेमलोआप्पा तिरुपती राठोड (६० वर्षे, रा. गेदलमरी ता. मुद्दे बिहाल जिल्हा विजापूर, व अशोक तुकाराम राठोड (५३ वर्षे, रा. हितनळी तांडा, ता. देवर हिप्परगी जि. विजापूर राज्य कर्नाटक) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर सुनिता रमेश राठोड (४५ वर्षे, रा. हेतनळी तांडा ता. जि. विजापूर) ही जखमी झाली आहे. किरकोळ जखमी झालेल्या त्या दोन मजुरांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्री. भोयर यांनी दिली.