अर्जुना, कोदवली नद्याना पूर; जवाहर चौकाला पुराचा वेढा

राजापूर:- राजापूर शहर आणि तालुका परिसरात सलग चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम राहिला आहे. रविवारी रात्री तालुक्यात सर्वत्र पडलेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्याना पूर आला असून पुराच्या पाण्याने शहर बाजारपेठेतील जवाहरचौकाला वेढा दिला आहे. तर अर्जुना आणि कोदवली नद्यांनी ईशारा पातळी ओलांडली असून प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे. या पुराच्या पाण्याने जवाहरचौकासह छत्रपती शिवाजी महाराज पथ, बंदरधक्का, गणेशघाट, चिंचबांध, वरचीपेठ रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर राजापूर, शिळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला असल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाली आहे. मात्र दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने राजापूरातील पुराचे पाणी ओसरू लागले मात्र हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा ईशारा लक्षात घेता व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत.

गुरूवार पासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका मोठया प्रमाणात तालुक्याच्या पश्चिम भागाला बसला आहे. मात्र रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्याना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवाहरचौकात पुराचे पाणी आले असून जवाहरचौकातील पानटपऱ्या, एसटीपीअपशेड पाण्याखाली गेली आहे. तर पुराचा फटका शहर बाजारपेठेला बसला असून बाजारपेठेतील व्यवहार थंडावले आहेत. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. तर जवाहर चौकाकडे येणारी एसटी वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. रविवारी सायंकाळनंतर पावसाने जोर धरल्याने मध्यरात्री पुराचे पाणी जवाहरचौक परिसरात शिरले. पावसाचा जोर वाढल्याने दुपारी ११ वाजता पाण्याने जवाहरचौकाला वेढा देत शिवस्मारकाकडे कुच केली होती. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, तहसिलदार विकास गंबरे यांनी सकाळी जवाहरचौकाला भेट देत पुराची पाहणी केली. तर पोलिस निरिक्षक अमित यादव यांनी पुरस्थितीची पाहणी केली. तातडीने बंदोबस्त लावत नागरिकांना सहकार्य केले. दरम्यान दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने जवाहरचौकातील पुराचे पाणी ओसरले आहे. मात्र हवामान विभागाने दिलेला मुसळधार पावसाचा ईशारा लक्षात घेता व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असून, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.