अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी

रत्नागिरी:- अरबी समुद्रात ‘शक्ती’ नावाचे चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे किनारपट्टी भागातील वातावरण बदलले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रशासनाने मच्छीमारांना तातडीने समुद्रात न जाण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले आहे.

‘शक्ती’ चक्रीवादळाचा प्रभाव किनारपट्टी भागांवर जाणवण्याची शक्यता असून, या दरम्यान वाऱ्याचा वेग ५० किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचू शकतो. यामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने किनारपट्टीवरील मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचे सक्त आवाहन केले आहे. समुद्रात अचानक मोठे बदल होण्याची आणि लाटा उसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी मच्छीमारांनी किनारी भागातच सुरक्षित थांबावे.
किनारी भागात सध्या वातावरण शांत असले तरी, पुढील २४ ते ४८ तासांत परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.