महायुतीच्या मेळाव्याला रेकॉर्ड ब्रेक गर्दी
रत्नागिरी:- खर्या अर्थाने आजपासून लढाईला सुरुवात झाली आहे. आपले मिशन १ लाख ५० हजार मतांचे आहे. सर्वाधिक मताधिक्क्याने तुम्ही मला निवडून द्या, हे सांगण्यासाठी मी आलो आहे. काहींनी माझ्यावर टीका केली. सामंत पूर्वपरिक्षेत नापास झाले. मात्र ज्यांनी पुर्वी अनुभव घेतला तोच यावेळी घेतील. विजयाचे पंचकच नव्हे तर विजयाचा षटकारदेखील हाच उदय सामंत मारणार, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. ते महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.
शुक्रवारी महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी जंगी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ना. सामंत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जवळजवळ २० हजार महिला रत्नागिरीत दाखल झाल्या होत्या. सकाळपासूनच रत्नागिरीत वाहनांची मोठी वर्दळ सुरू झाली होती. गाड्यांचे ताफेच्या ताफे रत्नागिरीत भरून येत होते. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उदय सामंत हे सभास्थानी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. उदय सामंत यांनी सांगितले की, आजपासून खर्याअर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. विजयाचा विक्रम याच मतदारसंघातून होणार आहे. आपले मिशन दीड लाख मतांचे आहे. माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व मला आशीर्वाद देण्यासाठी जवळजवळ २० हजारांच्या वर महिला याठिकाणी आल्या आहेत. या गर्दीनेच आज माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.
कोकणचा कायापालट होणार
यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की, मला आपला विकास करायचा आहे. कोकणचा कायापालट करणार हा मी संकल्प घेतला आहे. महाराष्ट्र विकासाचे एक व्हिजन महायुतीने डोळ्यासमोर ठेवले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात आपण बळकट करायला हवेत.
सभेला कोण येणार? मित्रपक्षाचे नेते येणार की नाहीत? गर्दी होणार की नाही? अशा चर्चा सुरू होत्या. या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले होते. या चर्चेला आता पुर्ण विराम मिळाला आहे. महाराष्ट्राला विकासात्मक पुढे न्यायचे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उद्योगमंत्री बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे तोंडभरून कौतुक केले. कोकणातल्या १५ मतदारसंघातील आमचे उमेदवार निवडून येतीलच असा दावा करत युतीचे सरकार येणे हे गरजेचे आहे. महायुती टिकली पाहीजे यासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारा नेता म्हणजे रविंद्र चव्हाण हे आहेत.
योजना बंद करून दाखवाच!
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून विरोधकांनी वावड्या उठवल्या आहेत. ही योजना निवडणुकीपुरती असून नंतर बंद होणार आहे, असे फेक नरेटीव्ह विरोधकांकडून निर्माण केले जात आहे. यापुर्वी न्यायालयात जाऊन ही योजना बंद पाडण्याचा घाटदेखील घातला. परंतु न्यायालयातदेखील सरकारच्या बाजूने कौल लागला. जोपर्यंत सूर्य-चंद्र आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना सुरू राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना ना. उदय सामंत पुढे म्हणाले की, आजच्या गर्दीने माझ्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे. प्रत्येकाने स्वत: उदय सामंत बनून काम करावे. मला थोडं मोकळं सोडा, महाराष्ट्राची जबाबदारीदेखील माझ्यावर आहे.