रत्नागिरी:- शहरातील परटवणे ते कोकणनगर मार्गावर भरधाव वेगाने चारचाकी वाहन पुढे जात असताना दुचाकीस्वाराला जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. उपचार सुरू असताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अब्दुल जब्बार महबूब पाशा (५५, रा. जमखंडी, कोकणनगर, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. ही घटना १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चारचाकीचा चालक विनीत विजय गझने (रा. नारायणमळी, रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकणनगर येथील चिंतामणी हॉस्पिटलसमोरून जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. अब्दुल जब्बार महबूब पाशा हे दुचाकीवरून (एमएच ०८, एएल ५२३५) परटवणेहून कोकणनगरकडे चालले होते. ते हॉस्पिटलनजीक आले असता त्यांच्यामागून कार घेऊन येणारा विनीतने (एमएच ०८, झेड २६३६) पाशा यांना जोरदार धडक दिली. यात पाशा गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.