अपघातात दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- बेदरकारपणे कार चालवून समोरुन येणार्‍या दुचाकीला धडक देत अपघात करुन दोघांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वा. पावस तेलीवाडी येथे घडली होती. 

संकेत दत्तात्रय इंगळे (रा.तुपेवाडी कडेगाव,सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे.तर या अपघातात रोशन रविंद्र चांदळे (27) आणि रजनी रविंद्र चांदळे (45,दोन्ही रा.गणेशगुळे,रत्नागिरी) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. शुक्रवारी संकेत आपल्या ताब्यातील कार (एमएच-13- एझेड-1171) घेउन भरधाव वेगाने गणेशगुळे ते रत्नागिरी असा येत होता.त्याच सुमारास रोशन आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08- एएच-6018) वरुन आपल्या आईला सोबत घेउन पावस ते गणेशगुळे असा येत होता. ही दोन्ही वाहने पावस तेलीवाडी येथे आली असता संकेतचा आपल्या कारवरील ताबा सूटला आणि त्याने रोशनच्या दुचाकीला धडक देत अपघात केला. यात रोशन आणि त्याची आई रजनी चांदळे दोन्ही जखमी झाले असून दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले आहे. या अपघात प्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार सावंत करत आहेत.