… अन् नर्सने लसीकरण केंद्राबाहेर पडून आजींना रिक्षामध्ये दिली लस 

रत्नागिरी:- कोरोना महामारीमध्ये आरोग्य कर्मचारी हेच देवदूत ठरत असल्याचा अनुभव अनेकांना येत आहे. आरोग्य कर्मचार्‍यांतील माणुसकीचा अनुभव रत्नागिरीतील एका वयस्कर आजीबाईंनाही आला आणि त्या सेवेने त्या भारावून गेल्या. वय अधिक असल्याने चालता येत नसल्याने लसीकरण केंद्रावरील नर्सने स्वतः बाहेर येऊन आजींना लस टोचली. 

जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. रत्नागिरीतील कोकणनगर येथील केंद्रावर लसीकरणासाठी एक आजीबाई सोमवारी गेल्या. त्यांना व्यवस्थित चालता येत नसल्यामुळे त्यांना रिक्षातच लस टोचण्यात यावी, अशी विनंती येथील आरोग्य कर्मचार्‍यांना करण्यात आली. सेवा बजावत असणार्‍या नर्सनेही लगेचच तयारी दाखवून रिक्षामध्ये असणार्‍या आजीबाईंना लस टोचली. शासकीय कर्मचार्‍यांच्या वर्तनातील माणुसकी पाहून आजीबाईही भारावून गेल्या.

रत्नागिरी शहरात लसीकरण केंद्रावर जाणार्‍यांसाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांनी मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. मलुष्टे यांच्या या सामाजिक उपक्रमाचा फायदा येथील सामान्य जनतेला होत असून त्याबाबत समाधान व्यक्त होत आहे. लसीकरणासाठी मोफत रिक्षा आवश्यक असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.