…अन्यथा आम्हीच शाळांना कुलूप ठोकू: अल्ताफ संगमेश्वरी

रत्नागिरी:- कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबला नाही तर आम्हालाच शाळांना टाळे ठोकावे लागेल असा इशारा शिरगावचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्‍वरी यांनी दिला.

श्री. संगमेश्‍वरी यांच्यासह पालकांनी मंगळवारी (ता. 23) जिल्हा परिषद सदस्य महेश उर्फ बाबू म्हाप यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षणाधिकारी श्रीमती वाघमोडे यांच्याशी चर्चा केली. मार्च 2020 पासून सुरु झालेले लॉकडाऊन 8 ते 10 महिने होते. या काळात सर्वच व्यवहार ठप्प होते. शाळाही बंद होत्या. याचा फटका अनेकांना बसला आहे. रोजगार, व्यवसाय ठप्प झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली. यातूनही मार्ग काढत संसाराचा गाडा हाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्यानंतर पहिले 1 ते 2 महिने शाळा व्यवस्थापनाने शुल्कासाठी कोणतीही मागणी केली नाही. आता काही खाजगी शाळांमधून शुल्कासाठी तगादा लावला जात आहे. अ‍ॅक्टिव्हीटी फीसह इतर वेगवेगळी कारणे देऊन हे शुल्क आकारणी होत आहे. 8 ते 10 महिने शाळा बंद होत्या. कोणतीच अ‍ॅक्टिव्हीटी झालेली नाही, तर असे शुल्क कसे काय आकारू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. मंगळवारी शहरातील नामवंत खाजगी शाळांमध्ये काही पालकांना घेऊन संगमेश्‍वरी यांनी जिल्हा परिषद गाठली. याठिकाणी सुरू असलेला प्रकार माजी सभापती बाबू म्हाप यांच्या निदर्शनास आणून दिला. शिक्षणाधिकार्‍यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.