रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार्या शिळ धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच पाणी कमी झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कडाक्याच्या उन्हामुळे बाष्पीभवन वेग वाढल्याने साठ्यात घट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शिळ धरणात सध्या 0.589 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. हा साठा 5 ते 6 जूनपर्यंत पुरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हे धरणातील पाण्याचा उपयोग रत्नागिरी शहरासाठी केला होता. या धरणातून दररोज 20 एमएलडी पाणी उचलले जाते. तापमान वाढल्यामुळे या धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे पाणी पातळी कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मे महिन्यात दरवर्षी शिळ धरणातील पाणी कमी होत जाते; परंतु यावर्षी प्रमाणापेक्षा अधिक पाणी कमी झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मार्च महिन्यापासून रत्नागिरीतील तापमान 39 अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. मधल्या कालावधीत अवकाळी पावसाचे आगमन झाले असले तरीही धरण परिसरात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे अवकाळीचाही फायदा धरण भरण्यासाठी झाला नाही. त्यामुळे धरणातील बहुतांश भाग सुखलेला आहे. नदीतील पाण्याबरोबर वाहून आलेली झाडेझुडपेही दिसत आहेत. मुख्य भिंतीजवळही पाणी कमी झाले असल्याने त्याचा परिणाम रत्नागिरी शहराला पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
पुरेशा पाण्यासाठी प्रतिक्षाच
रत्नागिरी शहराला शिळ धरण, पानवल धरण, नाचणे तलाव आणि एमआयडीसी धरणातून पाणी मिळते. परंतु, नवीन नळपाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर एमआयडीसीकडून घेण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. नाचणे तलाव आणि पानवल धरणातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठ्याचा भार शिळ धरणावर आला आहे. पुढेही हीच स्थिती असल्यामुळे एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात आल्याचे नगरपालिकेकडून जाहीर झाले आहे. शहराला नवीन पाणी योजना लागू केली असली तरीही काही ठिकाणी अजुनही पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यात एक दिवसा आड पाणी झाल्याने नागरिकांमध्ये काही भागात नाराजी व्यक्त केली जात आहे.









