अनुदानासाठी काहीही; कोरोनाने मृत 2 हजार 491 अनुदानासाठी अर्ज 2 हजार 848

रत्नागिरी:- कोरोनामुळे मृत्यु झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारमार्फत मदत देण्यात येणार आहे. परंतु रत्नागिरी जिल्ह्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेसह आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 491 रूग्णांचा मृत्यु झालेला असताना मदतीसाठी तब्बल 2 हजार 848 अर्ज दाखल झाले आहेत. मृतांच्या संख्येपेक्षा मदतीसाठी नातेवाईकांचे जास्त अर्ज आल्याने अर्जांची छाननी करताना एकाच मृताच्या दोन-दोन नातेवाईकांनी मदतीसाठी अर्ज केल्याचे पुढे आले आहे.

कोरोनाने मृत्यु झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना राज्य सरकारमार्फत प्रत्येकी 50 हजार रु.ची मदत दिली जाणार आहे. यासाठी आवश्‍यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आलेल्या ऑनलाईन अर्जांची छाननी करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांवर देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 491 रूग्णांचा मृत्यु झालेला असतानाच 2 हजार 848 अर्ज आल्याने आता मृताचा खरा नातेवाईक कोण? हे शोधल्यानंतरच दिली जाणार आहे. मृतांच्या नातेवाईकांना मदत देताना वारस तपासाद्वारे निश्‍चित केलेला वारसच मदतीसाठी पात्र असताना एकाच मृताच्या दोन-दोन नातेवाईकांनी मदतीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहे. अर्ज करताना अन्य वारसांना अंधारात ठेवण्यात आले आहे.

एका मृताच्या मदतीसाठी दोन-दोन नातेवाईकांनी अर्ज केल्याने अर्जाची छाननी करताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत तब्बल 500 हून अधिक अर्जांना जिल्हा शल्यचिकित्सकांना मान्यता देऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. परंतु जादा अर्जाची छाननी करण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे.

मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार रुपये मदत मिळणार असल्याने नातेवाईकांची मदतीसाठी चढाओढ सुरू आहे. तर शासनाने निश्‍चित केलेल्या कोरोना पॉझिटीव्ह कालावधीनंतर  मृत झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनीही अर्ज दाखल केले आहे. त्या अर्जांची छाननी करण्यासाठी अनेक कागदपत्रांची शोधाशोध करावी लागत आहे.
योग्य कागदपत्रे तसेच योग्य वारस असलेल्या नातेवाईकांच्या प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्यात येत आहे.

खरा वारसदार नसताना कागदपत्रे सादर करून कोणी मदत मिळवली तर अशा व्यक्तींकडून मदतीची वसुली करून फौजदारी गुन्ह्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे जे खरे वारसदार आहेत त्यांनी योग्य कागदपत्रासहीत अर्ज करणे अपेक्षित असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितले.