१३८ ब्रास वाळू करण्यात आली जप्त
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी अनधिकृत वाळु उत्खननाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांच्या पथकाने सदर ठिकाणी काही पांढ-या वाळूच्या साठ्यांवर कारवाई केलेली आहे. सदर उत्खनन कोणी केले आहे याबाबत स्थानिकरित्या चौकशी केली असता काहीही माहिती मिळु शकली नाही, त्यामुळे सदर वाळु नुकतीच जप्त करण्यात आलेली आहे.
यामध्ये काळबादेवी, बसणी व झाडगाव-पांढरा समुद्र या भागात प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये काळबादेवी येथुन १२ ब्रास पांढरी वाळु, पांढरा समुद्र येथुन ५० ब्रास आणि बसणी येथुन ७६ ब्रास अशी एकुण १३८ ब्रास वाळु जप्त करण्यात आलेली आहे आणि सदर वाळु जप्त करुन स्थानिक पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. सदर वाळुची शासकीय बाजारभावानुसार अंदाजे २ लाख ७६ हजार रुपये इतकी किंमत होत आहे. सदर वाळु साठ्यांचे जाहीर लिलावासाठी उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या कार्यालयास प्रस्ताव सादर केलेला आहे. काळबादेवी व बसणी येथील कारवाई मंडळ अधिकारी, कोतवडे श्री.कांबळे यांच्या पथकाने आणि या पथकातील सदस्य तलाठी काळबादेवी व तलाठी बसणी यांनी केली. तर झाडगाव-पांढरा समुद्र येथे मंडळ अधिकारी रत्नागिरी श्री. चव्हाण यांच्या पथकाने आणि या पथकातील सदस्य तलाठी झाडगांव व मिर्या यांनी कारवाई केलेली आहे. शासनातर्फे कोणत्याही प्रकारे रत्नागिरी तालुक्यात वाळु उत्खननास परवानगी देण्यात आलेली नाही त्यामुळे तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अनधिकृत वाळु उत्खनन होत असल्यास तात्काळ तहसील कार्यालयास माहिती देण्यात यावी असे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केली आहे.