रत्नागिरी:- जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्यांसह अधिपरिचारीकांच्या वेतन प्रश्नावर आरोग्य संचालकांच्या उपस्थितीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी (ता. 13) बैठक घेतली. रखडलेले वेतन आठवडाभरात होईल असे आश्वासन संचालकांनी दिले असून उर्वरित समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.
जिल्हा शासकीय रुग्णालयातील समस्यांवर घेतलेल्या बैठकीला मंत्री सामंत यांच्यासह आरोग्य संचालक दुर्गप्रसाद पांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, प्रमोद शेरे यांच्यासह अन्य काही पदाधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या 36 अधिपरिचारिकांचा दोन महिने पगार झालेला नव्हता. त्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन चालू केले होते. वेतन मिळावे यासाठी त्यांनी मंत्री सामत यांना साकडे घातले होते. हा प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य संचालक दुर्गप्रसाद पांडे यांच्याबरोबर बैठक लावली होती. यावेळी पगार वेळेत काम मिळत नाही यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संबंधित अधिपरिचारकांनी सिव्हीलमधील अधिकार्यांकडून तुसडेपणाची वागणुक दिली जाऊ नये अशी तंबी मंत्री सामंत यांनी दिली. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारात वेळीच सुधारणा करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. मानधनाचा प्रश्न सुटणार असल्यामुळे संबंधितांनी कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.
सिव्हीलमध्ये काही ठिकाणी प्रशासकीय अधिकारी नाहीत. त्यांच्या नियुक्तीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आरोग्य संचालकांनी सांगितले. प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी पुन्हा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिव्हीलमधील लिफ्ट बंद असून त्याच्या दुरुस्तीचा नवीन प्रस्ताव पाठवा अशा सुचना श्री. पांडे यांनी दिल्या आहेत.