जि. प. अध्यक्ष जाधव; शिक्षण विभागाचे कौतुक
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेचे कामकाज उत्तमरितीने आणि दिमाखदार पध्दतीने काम सुरु आहे. गुहागर गटशिक्षणाधिकारी वगळता अन्य अधिकारी नाहीत. आम्हाला आमच्या अडचणी माहिती आहेत. त्यांची कोणी दखल घ्यावी, अशी फार गरजही मला वाटत नाही. आमचे सर्व पदाधिकारी सक्षमपणे जिल्हा परिषदेचे कामकाज चालवत आहोत. अधिकारी चांगले काम करत आहेत, असे प्रतिपादन करत अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी कारभाराबद्दल समाधान व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, सभापती परशुराम कदम, सभापती भारती सरवणकर, सभापती रेश्मा झगडे, प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्यासह सर्व अधिकारी आणि पुरस्कारप्राप्त शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांमध्ये एकनाथ चांदे, महेश कोकरे, राजेश भागणे, शितल राजे, ममता विचारे, नथुराम पाचकले, विद्याधर कांबळे, नानासाहेब आप्पा गोरड, दिपक धामापुरकर, सुनिल भोसले आदींचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ते म्हणाले, जिल्हावासीयांमध्ये अफाट गुणवत्ता आहे. अनेक क्षेत्रात ती पहायला मिळाली आहे; मात्र स्पर्धा परिक्षांच्या क्षेत्रात रत्नागिरीतील तरुण पिढी मागे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहीजेत. सध्या नवोदय विद्यालयात यंदा प्रथमच जिल्ह्यातील पंचवीस टक्केहून अधिक मुलांना प्रवेश मिळाला आहे. हा टक्का वाढविण्यासाठी केंद्रस्तरावरुन प्रयत्न केले पाहीजेत. सध्या कोरोनातून जग सावरत आहे. भविष्यात शिक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवून आपण काम करणार आहोत. कोरोनामुळे आरोग्य क्षेत्राकडे सर्वांचेच लक्ष होते. त्यामधून चांगल्या सुविधाही निर्माण करता आल्या आहेत. भविष्यात स्पर्धा परिक्षा डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे.
शिक्षकांच्या कामाचे कौतुक करतानाच उपाध्यक्ष उदय बने यांनी रिक्त पदे असतानाही सीईओ प्रशासनाचा गाढा हाकत असल्याचे सांगितले. तसेच अध्यक्ष, सभापती आणि प्रशासनाने यावेळी पुरस्कारासाठी शिक्षक निवडताना कुठेही डाग लागणार नाही याची काळजी घेतली आहे. तावूनसुलाखून असे पुरस्कार दिले असल्याचे समाधान व्यक्त केले. तर सभापती परशुराम कदम यांनी सीईओंच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. सीईओ डॉ. जाखड यांनी शिक्षक आणि पालकांनी एकत्रीत येऊन मुलांना घडविण्यासाठी प्रयत्न करावते. मुलांना काय बनायचे आहे, याचा विचार पालकांनी केला पाहीजे. तसेच शिक्षण विभागाने भविष्यात तंत्र बदलून काम करावे अशी सुचनाही केली.
दरम्यान, शिक्षण विभागाला सुचना करतानाच सदस्य बाबू म्हाप यांनी या कार्यक्रमाला मंत्री, आमदारांनाही बोलावले पाहीजे होते असे शिक्षणाधिकार्यांना बजावले होते. हाच धागा पकडत अध्यक्ष विक्रांत म्हणाले की शिक्षण विभागाने कार्यक्रमाचे नियोजन चांगले आणि तोलूनमापून केले आहे. उदय बने यांनीही त्याचे कौतुक केले. सीइओंनी भविष्यात डोळयात तेल घालून पत्रिका बनविली पाहीजे. कारण पुर्वी देखीलही पुरस्कार वितरणाच्या पत्रिका याच फॉर्मेटमध्ये काढल्या जात होत्या; परंतु त्यावेळी अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव नव्हते.









