रत्नागिरी:- पंचयात समितीच्या ९ कोटीच्या नवीन इमारतीच्या भुमिपूजन सोहळयाच्या निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून काल लोकप्रतिनिधी विरुद्ध शासकीय अधिकारी, असा सामना रंगला. याचे पडसात आजच्या पंचयात समितीच्या मासिक सभेत उमटण्याची शक्यता होती. परंतु या विषयाला बगल देऊन सभेचे कामकाज सुरू ठेवण्यात आले. त्यात २० सदस्यांपैकी गटनेत्यांसह अनेक सदस्यांनी दांडी मारल्याने तेरी भी चुप आणि मेरी भी चुप, असे चित्र सभागृहात दिसत होते.
पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र काही माजी सभापती यांचा पाठपुरावा आणि मंत्री उदय सामंत यांनी यामध्ये लक्ष घातल्याने इमारतीला ९ कोटी रुपये मंजूर होऊन काल त्याच्या भुमिपुजनाचा कार्यक्रम होता. त्यासाठी पंचयात समितीच्या शासकीय अधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिका काढली. शासकीय कार्यक्रम असला तरी राजशिष्टाचार बाजूला ठेऊन जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींना यातून वगळण्यात आले. त्यामुळे लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड नाराजी होती. मंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनाच यातून वगळण्यात आल्याने त्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. उपअध्यक्ष श्री. बने यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांची चौकशी लावली.
या निमंत्रण पत्रिकेवरून लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी असे काही वातावरण तयार झाले आहे. पंचायत समितीच्या आजच्या सभेमध्ये हा विषय चर्चेला येण्याची शक्यता होती. मात्र आजच्या सभेला सद्स्यांची उपस्थिती रोडावल्यामुळे थेट विषय पत्रिकेवरील विषयाला हात घालण्यात आला. या विषयाला बगल देण्यात आल्याचे दिसून आले.









