अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र रत्नागिरीकरांच्या सेवेत; मिळणार 100 टक्के शुद्ध पाणी

३० वर्षांनी दुरुस्ती; दोन कोटीचा खर्च

रत्नागिरी:- पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राने नवे रुप घेतले आहे. ३० वर्षानंतर प्रथमच या केंद्राची सर्व बाजूंनी दुरुस्ती करण्यात आली आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्वच्छ पाणी शहरवासीयांना वितरित होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नुतनीकरण झालेल्या केंद्राचे उदघाटन झाले. अत्याधुनिक फिल्टरहाऊस बनल्याने १०० टक्के शुद्ध पाणी शहरवासीयांना मिळण्यास सुरवात झाली आहे. 

पालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून एरिएशन फाउंटन दुरुस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिट अशी यांत्रिक व विद्युत दुरुस्ती करून पालिकेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनवला आहे. शहरातील साळवी स्टॉप येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दिवसाला सुमारे १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता केंद्राची आहे; मात्र गेल्या ३० वर्षांमध्ये त्याची दुरुस्ती झालीच नाही. जलशुद्धीकरणाचा दर्जा घसरला होता. ते शहरवासीयांच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह सर्व नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी एकत्रित बैठक घेतली. स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. फिल्टर हाउसच्या दुरुस्तीसाठी २१ कोटीचा निधी दिला. संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती घेतली.
मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण केंद्राचे उदघाटन झाले. या वेळी नगराध्य़क्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रमोद शेरे, संजय साळवी, बिपिन बंदरकर, निमेश नायर आदी उपस्थित होते. त्यामुळे शहवासीयांना १०० टक्के शुद्ध पाणी मिळणार आहे. पावसाळ्यातील गढूळ पाणीदेखील फिल्टर झाल्यानंतर १०० टक्के शुद्ध मिळेल. सध्या दिवसाला ११ एमएलडी पाणी शुद्ध करून ते पुरविले जाते; मात्र नवीन ३ विद्युत पंप बसविल्याने त्याची क्षमता वाढली असून १८ एमएलडी पाणी उचलले जात आहे.