अतिवृष्टी नुकसानीपोटी 8 कोटी 47 लाखांचा निधी

रत्नागिरी:-  जुन ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून 8 कोटी 47 लाख 99 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचे वाटप तहसिलदारांमार्फत होणार आहे. 
ऑक्टोबर महिन्यात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात 64 हजार शेतकर्‍यांचे 11 हजार 812 हेक्टर भात, नाचणी पिकांचे नुकसान झाले होते.

जुनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. त्यामध्ये दापोली, मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात काही कोटींचे नुकसान झाले होत. त्यातील नुकसानग्रस्तांना तत्काळ मदतवाटप जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर 10 जुनला मान्सुन सक्रीय झाला. पुढील कालावधीत मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती ओढवली होती. वादळी वार्‍यामुळे घरा, गोठ्यांसह भातशेतीचेही नुकसान झाले होते. सर्वात कहर झाला तो 10 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अरबी समुद्रात विलीन झाले. बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी झाली. ऐन कापणीत पडलेल्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. यामध्ये नदीकिनारी भातशेती वाहून गेली. हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. या कालावधीत जिल्ह्यातील 64 हजार शेतकर्‍यांचे 11 हजार 812 हेक्टरचे नुकसान झाले. शासनाने हेक्टरी 10 हजार रुपये देण्याचे निश्‍चित केले. त्या दरानुसार 9 कोटी 60 लाख रुपयांची गरज भासणार आहे. जुन ते ऑक्टोबर या कालावधीत नुकसान झालेल्यांना मदत म्हणून पहिल्या टप्प्यात निधी मंजूर केला आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्याला 8 कोटी 47 लाख रुपये मिळणार आहेत. त्यात भातशेतीसह फळबागायतींसाठी जुन्या निकषानुसार 4 कोटी 82 लाख 39 हजार आणि वाढीव निकषानुसार 2 कोटी 26 लाख 63 हजार रुपये मिळणार आहेत. तसेच घरातील साहित्याचे नुकसानीपोटी 12 लाख 4 हजार, मृत जनावरांसाठी 5 लाख 66 हजार रुपये, कच्ची व पक्की घरांसाठी 1 कोटी 21 लाख मंजूर आहेत. त्याचे वाटप तत्काळ सुरु करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यामुळे दिवाळीपुर्वी शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे.